Police| (Photo Credits: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra)  कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची सद्यची परिस्थिती पाहता फार गंभीर असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अनिवार्य आहे. मात्र तसे काही होत नसून उलट कोरोनाबाधितांचा आकडा आता वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस रस्त्यावर गस्त घालून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करत आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. जसे वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस सुद्धा 24 तास कोरोनाच्या परिस्थितीत काम करत आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पोलिसांकडून कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरु नये यासाठी तेथे सुद्धा पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य सर्वोतोपरी पार पाडत असताना त्यांना सुद्धा आता कोरोनाची लागण झाली आहे. तर 96 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. (Coronavirus: यवतमाळ येथे आणखी 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 30 वर)

दरम्यान, राज्यात 69,374 जणांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांनी लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत 477 जणांना पोलिसांवर हल्ला आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सुद्धा पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते.