ठाणे (Thane) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. ठाणे शहरात कोरना व्हायरसचे 16 हॉटस्पॉट (Coronavirus Hotspots) असल्याचे पुढे आले आहे. या 16 ठिकाणी 13 मार्च ते 31 मार्च 2021 या काळात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) प्रशासनाने घेतला आहे. ठाणे महापालिका आयुक्त बिपीन शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत. हा लॉकडाऊन केवळ हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणीच असणार आहे. ज्या ठिकाणी हॉटस्पॉट नाहीत अशा ठिकाणी सुरु असलेल्या सेवा नियमीत असणार आहेत. अशा ठिकाणी 'मिशन बिगीन अगेन' सुरु करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा त्यास विरोध दर्शविल्यास संबंधित व्यक्तिविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60, साथरोग नियंत्रण अधिनियम 1957 व भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये दंडनिय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (हेही वाचा, Coronavirus in Dharavi: धारावी परिसरात कोरोना व्हायरस संक्रमण वाढले, दिवसभरात 18 नव्या रुग्णांची नोंद)
ठाण्यातील कोरोना हॉटस्पॉट
- ठाण्यातील एकूण तीन सर्कलमधील एकूण 16 परिसर हॉटस्पॉट्स (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यपैकी सर्कल वनमधील कळवा प्रभाग समिती भागात विटवा, ऐनगर, सूर्यनगर, खारेगाव भागात चंदनी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर भागात हॉटस्पॉट आहेत.
- सर्कल दोनमध्ये लोधा अमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मीडोज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि लोकमान्य अशी हॉटस्पॉट्स आहेत.
- सर्कल तीनमधील सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्र हॉटस्पॉट्स दोस्तनगर, शिवई नगर, कोरस टॉवर, कोलाबाद आणि रुस्तमजी वृंदावन येथे आहेत.
महाराष्ट्रात दिवसभरात 8744 रुग्णांची नोंद
मुंबई, ठाणे शहरांसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8744 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले आहे. तर, 9068 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत 22,28,471 जणांना कोरोना संसर्ग झाला. आतापर्यंत एकूण 20,77,112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 52,500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या उपचार घेत असलेल्यांची संख्या 97,637 इतकी आहे.
Maharashtra reports 8744 new #COVID19 cases, 9068 discharges and 22 deaths in the last 24 hours.
Total cases 22,28,471
Total recoveries 20,77,112
Death toll 52,500
Active cases 97,637 pic.twitter.com/6LVAXsJNrZ
— ANI (@ANI) March 8, 2021
मुंबईत दिवसभरात 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण
दरम्यान, मुंबई शहरात आज (8 मार्च) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 956 जणांना डिस्चार्ज मिळाला. संपूर्ण दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 इतकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान, ही माहिती देताना मुंबई महापालिकेने म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 3 रुग्ण पुरुष तर एक महिला रुग्ण होती. त्यापैकी 3 रुग्णांना प्रदीर्घ काळापासून काही आजार होते. तसेच चौघांचेही वय 60 वर्षांहून अधिक होते.
8-Mar, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/dscQSGPByC
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 8, 2021
धारावीत संख्या वाढली
दुसऱ्या बाजूला अशिया खंडातील आणि मुंबई (Mumbai) शहरातील सर्वात दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असेल्या धारावी (Dharavi) झोपडपट्टी परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची एक अंकी किंवा शून्य असलेली संख्या आज (8 मार्च) अचानक दोन अंकी झाली. आज दिवसभरात धारावीमध्ये COVID-19 संक्रमित 18 रुग्ण आढलले. गेल्या काही दिवसातील आकडेवारीत गाठलेला हा उच्चांक आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.