कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद झाले. असाच परिणाम अनेक देवस्थानांवरही झाला आहे. देशातील अनेक महत्वाची मंदिरे (Temple) बंद असल्याने मिळणाऱ्या देणग्या थांबल्या आहेत. असाच फटका शिर्डीच्या साईबाबा संस्थानला (Shirdi Sai Baba Mandir Trust) बसला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानने कंत्राटी कामगारांचे वेतनाची 40 टक्के कपात केली आहे. या आधी या लोकांचे वेतन वाढवण्यात आले होते. लॉक डाऊनमुळे शिर्डी येथील साई बाबा मंदिर ट्रस्ट दररोज जवळजवळ दीड कोटी रुपयांच्या दानाला मुकत आहेत. त्यामुळे हा वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला.
शिर्डीचे साईबाबा मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा पसारा इतका मोठा आहे की, संस्थानचे तब्बल चाळीस विभाग असून यामध्ये 1905 कायम कर्मचारी आहेत. संस्थानने यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली नाही. याशिवाय विविध विभागात सरकारी आदेशाप्रमाणे कामावर घेतलेले 598 कामगार व इतर 1950 कंत्राटी कामगार आहेत. या लोकांना किमान वेतनापेक्षा 40 टक्के जास्त पगार दिला जातो, आता संस्थानने या पगारामध्ये कपात केली आहे.
यासह अशी अनेक कामे आहेत जी संस्थान बाहेरच्या लोकांकरवी करून घेते. लॉक डाऊनच्या काळात या लोकांनी काम केले नसल्याने त्यांनाही पगार दिला गेला नाही. अशा कामगारांची संख्या जवळजवळ 1 हजार आहे.
दरम्यान, शिर्डीची साई बाबा संस्था अनेक सामाजिक कार्ये करते. शिर्डी संस्था दरवर्षी 40 कोटी रुपये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूवर खर्च करते, जे कमी किंमतीमध्ये भक्तांना दिले जातात. त्यानंतर, शिर्डी संस्थान दरवर्षी हजारो लोकांना विविध आजारांवर नि:शुल्क उपचार देते. शिर्डी संस्था गरीब मुलांच्या शिक्षणावरही मोठा खर्च करते, यासाठी 15 कोटी रुपये खर्च केले जातात. हजारो कर्मचारी बाबांचे मंदिर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तिथली व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. साई संस्था यावर दरवर्षी 160 कोटी खर्च करते. साई संस्थेकडे सध्या बँकेत 2300-2400 कोटी रुपये जमा आहेत, ज्यावर दरवर्षी व्याज म्हणून 100-150 कोटी रुपये मिळतात.