भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधोपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बुधवारी नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपययोजनांचा आढावा घेतला आहे. दरम्यान, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कोविड रुग्णालयाला भेऊन देऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मुंबई, ठाणे महापालिकेच्या तुलनेत नाशिकमध्ये राजकीय स्थिती वेगळी आहे. नाशिक महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. कोरोनाच्या अधिकाधिक तपासण्यांची गरज भाजप नेत्यांकडून राज्यात सर्वत्र मांडली जात असतांना नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीमुळे तपासणी साहित्याचा तूटवडा निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, माजी पालकमंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थित नाशिक येथे नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, त्यांनी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थितीबाबत भाष्य केले. दवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरने लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. चाचण्यांचे अहवाल 24 तासात कशा येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणे असलेल्या रूग्णाच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. याशिवाय खाजगी रूग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात आज 6 हजार 603 रुग्णांची नोंद, तर 198 जणांचा मृत्यू
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-
📍Malegaon | मालेगाव
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज कोविड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. #CoronaInMaharashtra pic.twitter.com/41TU5GAfks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
तसेच, नाशिक सध्या क्रिटीकल टप्प्यात आहे. थोडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज. प्रशासन काम करते आहे. पण, ते काम प्रत्यक्ष जमिनीवर पण दिसले पाहिजे. काल मुंबईत थोडे कमी म्हणजे 806 रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ 3300 चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्याप्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात. केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी कोरोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पत्रकारांच्या सेवा या अत्यावश्यक सेवांमध्ये येतात. त्यांना सर्व त्या सोयीसवलती देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय केले पाहिजेत, असेही ते म्हणाले आहेत.