कोरोना व्हायरस लॉक डाऊन 4 (Coronavirus Lockdown 4) चा कालावधी आता संपत आला आहे, या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीत कोरोना व्हायरस नियोजन, लॉक डाऊन यांसह इतर काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यानी काल (26 मे 2020) एक पत्रकार परिषद घेत, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला कशी मदत केली याची आकडेवारी दिली होती. या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेला मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘राज्यात कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित काम सुरू आहे. मुंबईची अवस्था काळजी करण्यासारखी असली तरी, हॉस्पिटलची व्यवस्था केली आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. मात्र विरोधीपक्ष सहकार्य करण्याऐवजी वेगळी मोहीम उघडून गोंधळ निर्माण करत आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती, मात्र त्यांचे काहीतरी वेगळे सुरु आहे. असे असले तरी आम्ही या कोरोनाचा सामना नक्की करु आणि महाराष्ट्राला कोरोनातून बाहेर काढू.’
त्यानंतर अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जी आकडेवारी सांगितली त्याला उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘मजुरांच्या छावणीसाठी 1611 कोटी रुपये केंद्राने दिले असे सांगितले आहे, मात्र हे पैसे आपत्ती नियोजनासाठी दिले आहेत. साधारण 4 हजार कोटी प्रत्येक राज्याला आपत्ती नियोजनासाठी मिळत असतात, त्यातील हे 1611 कोटी रुपये आहेत. EPFO चे पैसे अजून तरी महाराष्ट्राला मिळाले नाहीत. केंद्राने नेहमी ट्रेनच्या वेळा बदलल्या, ट्रेनची माहिती लवकर दिली नाही. मात्र तरी महाराष्ट्राने मजुरांना घरी पाठवण्यासाठी उत्तम कामगिरी केली. केंद्राने गुजरातला 1500 ट्रेन्स दिल्या मात्र महाराष्ट्राला फक्त 700 ट्रेन्स मिळाल्या. या ट्रेन्ससाठीही सर्व पैसे महाराष्ट्राने दिले आहेत.’ परब यांनी पुढे सांगितले की, ‘जेवढ्या चाचण्या महाराष्ट्रात झाल्या तेवढ्या कुठेही झाल्या नाहीत. मुंबई हे इतके गर्दीचे शहर असून, इथे एक मेगा रुग्णालय उभारले गेले, जे कौतुकास्पद आहे. (हेही वाचा: Coronavirus: पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडले देवेंद्र फडणवीस यांचे आकडे; पोस्ट केला Video, दिले आव्हान)
त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या दिवसांपासून मुंबई व महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली आहे, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, मात्र हे पूर्णतः चुकीचे आहे. मुंबईमध्ये जे योजनाबद्ध काम चालू आहेत त्यामुळे इथल्या रुग्णांची संख्या वाढली नाही. राज्याने 10 जणांच्या टीमचे टास्क फोर्स उभारले आहे, जे राज्यातील रुग्णांना मदत करत आहेत. मुंबईने डबलिंगच्या रेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आधी हा रेट 3.8 होता तो आता 14.2 झाला आहे. महाराष्ट्राने सीएम फंडामधून कामगारांच्या ट्रेन्सचे पैसे दिले, यासाठी केंद्राने अजिबात मदत केली नाही.’
त्यानंतर पाटील यांनी महाराष्ट्राने काय मागितले व केंद्राने काय दिले याची आकडेवारी सांगितली, त्यानुसार – राज्याने जवळजवळ 48 लाख एन 95 मास्क मागितले होते, मात्र केंद्राने 13 लाखच दिले. राज्याने 17 लाख पीपीई कीट मागितले होते, केंद्राने 21 मे पर्यंत याचा काहीच पुरवठा केला नव्हता. ग्लोव्हज 25 लाख मागितले होते, मात्र केंद्राने 28 हजारच दिले.’ अशा प्रकारे महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.