Coronavirus (Photo Credits: PTI)

काल महाराष्ट्रामधील दोन आमदार व खासदार यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याची बातमी आली होती. आता ठाणे कारागृहातील (Thane Jail) एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह वीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व लोकांना कोविड केअरच्या विविध केंद्रांमध्ये दाखल केले गेले आहे. कडक लॉकडाऊन असूनही महाराष्ट्रातील तुरूंगातील सुमारे 800 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कारागृहात कडक लॉक डाऊन प्रक्रियेचा अवलंब केला असूनही आणि तळोजा व कल्याणमध्ये नवीन कैद्यांना तात्पुरत्या सोयीसाठी ठेवण्यात आल्यानंतरही ही नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

तुरुंगातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या आठवड्यात ठाणे कारागृहातील वीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. काही कर्मचार्‍यांनी लक्षणे दर्शविल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील काही जणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. आता त्यांना कोविड केंद्रांवर उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे.' कर्मचार्‍यांनी विषाणूचा संसर्ग कसा झाला, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. इथल्या एका वरिष्ठ अधिका-यालाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती, मात्र हा अधिकारी बारा होऊन पुन्हा कामावर रुजू झाला. (हेही वाचा: नायर रुग्णालयात आतापर्यंत 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची यशस्वी प्रसुती)

तुरुंगातील अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, महाराष्ट्र कारागृहात सुमारे 800 लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे - यामध्ये 600 कैदी आणि 170 कर्मचारी आहेत. 200 कैदी आणि 57 कारागृह कर्मचारी संक्रमित झाल्याने, नागपूर कारागृहात सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 22 जून रोजी ठाणे कारागृहात काम करणाऱ्या चार सुरक्षा रक्षकांना कोरोना  व्हायरसची लागण झाली. दरम्यान, ठाणे शहरात 21 जुलै रोजी कोरोना विषाणूच्या 187 रुग्णांची नोंद झाली. सध्या शहरामध्ये 5,388 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार चालू आहेत.