मुंबई: Breach Candy Hospital नजिक रेस्टॉरंटमध्ये 245 विनामास्क नागरिकांवर BMC ची कारवाई; Gaumdevi Police Station मध्ये तक्रार दाखल
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पुन्हा चिंतेची बाब बनत चालली आहे. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे पण त्यासोबतच कोविड 19 गाईडलाईनचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वारंवार प्रशासनाकडून त्याबाबत सूचना देऊनही मुंबईत काल (17 मार्च) ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार सुरू असल्याचे समोर आले. यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या विशेष पथकाने कारवाई करत 245 विनामास्क नागरिकांकडून दंड आकारला आहे. सोबतच गावदेवी पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या लोकांकडून वसूल करण्यात आलेली दंडाची एकूण रक्कम 19,400 रूपये आहे.

सध्या कोविड 19 चं संकट पाहता पुन्हा रेस्टॉरंट, हॉटेल, बार हे 50% क्षमतेने चालवण्याचे आदेश आहेत. मात्र बीएमसीच्या पथकाला अर्बरझीन रेस्टॉरंट मध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसल्याने त्यांनी कारवाई केली आहे. यावेळी मास्क नसण्यासोबतच सोशल डिस्टंसिंगचा नियम देखील धाब्यावर बसवण्यात आला होता.

मुंबई पालिकेच्या वॉर्ड डी मध्ये असलेल्या या रेस्टॉरंटवर पालिकेचे कमिशनर प्रशांत गायकवाड यांनी कारवाई केली आहे. कोविड 19 नियमांचे उल्लंघन केल्याने आता त्यांना रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर त्यांच्या रेस्टॉरंटला लायसन्स रद्द करण्याबाबत एक नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती देताना शहरात लॉकडाऊन लावायची वेळ आल्यास पहिला हतोडा नाईट क्लब्स वर पडणार असल्याचं सांगितलं होतं. अद्याप राज्य सरकार मुंबई मध्ये लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाही. पण नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.