मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णांनी दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,360 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,90,138 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाचे 1,884 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,54,088 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनाच्या 27,063 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये कोरोनाच्या 52 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,601 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 31 रुग्ण पुरुष व 21 रुग्ण महिला होत्या. यातील 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 40 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.15 टक्के आहे. 22 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 10,35,440 इतक्या आहेत, तर मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर पुन्हा वाढून 61 दिवस झाला आहे. (हेही वाचा: मुंबई: लॉकडाउन मध्ये सहा महिने वडापावचा धंदा बंंद, पैसे नाही म्हणुन विक्रेत्याची बिल्डिंगवरुन उडी मारुन आत्महत्या)
पहा ट्वीट -
23-Sep, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/13fevFHiNL
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 23, 2020
मुंबईमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 22 सप्टेंबर नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 633 इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 10,319 इतक्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 21,029 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात कोरोनाचे 19,476 रुग्ण बरे झाले असून, 479 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 12,63,799 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 2,73,477 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 9,56,030 रुग्ण बरे झाले असून 33,886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.