Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाचा (Coronavirus In Maharashtra) उद्रेक दिवसागणिक अधिकच भीषण होत आहे. आज, सोमवार, 6 एप्रिल रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची 33 नवे प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये सर्वाधिक नवे रुग्ण हे पिंपरी चिंचवड मध्ये असल्याचे समजतेय. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आज पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचे 19 , मुंबई मध्ये 11 आणि अहमदनगर, वसई, सातारा येथून प्रत्येकी 1 नवं कोरोना प्रकरण उघड झाले आहे. यानुसार कोरोनाच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या ही 781 वर पोहचली आहे. आतापर्यंत, कोरोनामुळे महाराष्ट्रात 45 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 54 जणांना काल पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील वाढती रुग्णांची संख्या ही कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितले होते.
प्राप्त आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत, सद्य घडीला देशभरात मागील 12 तासात कोरोनाची 409 प्रकरणे समोर आली आहेत त्यानुसार देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4067 वर पोहचली आहे, यापैकी 3666 प्रकरणे पॉझिटिव्ह असून यातील 291 जणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशातील कोरोना बळींचा आकडा 109 वर पोहचला आहे.
ANI ट्विट
33 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today - 19 in Pimpri-Chinchwad, 11 in Mumbai, 1 each in Ahmednagar, Satara and Vasai. Total number of positive cases in the state now stands at 781: Maharashtra State Health Department
— ANI (@ANI) April 6, 2020
दरम्यान, कोरोनाला लढा देण्यासाठी महाराष्ट्रात वैद्यकीय उपकरणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, सुमारे 25 हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच लवकरच आणखी व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनावरील उपचारांसाठी विशेष हॉस्पिटलची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे.