Coronavirus In Maharashtra:  देशात सर्वाधिक 33 कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्यात; पिंपरी चिंचवडमध्ये आढळला नवा रूग्ण
Coronavirus in India | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 33 वर पोहचली आहे. दरम्यान नुकताच पुण्याजवळ पिंपरी चिंचवड भागामध्ये एका रूग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यातील कोरोनाचा धोका वाढत आहे. तर देशात कोरोनाचे 110 रूग्ण आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची वाढती दहशत पाहता मुंबई शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तर पुण्यामध्ये तो आज लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारने दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत सार्‍या शाळा, कॉलेज, आंगणवाड्या बंद राहतील. मात्र 12 वी आणि 10 वी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडेल. तर चित्रपटगृह, नाट्यगृह 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. पुणे: सोशल मीडियावर Coronavirus संदर्भात अफवा पसरवणाऱ्या विरोधात तक्रार दाखल; राज्यातील पहिलीच घटना.

 

महाराष्ट्रात सध्या पुणे शहरात 16, मुंबई मध्ये 5, नागपूर मध्ये 4, यवतमाळ आणि नवी मुंबई मध्ये प्रत्येकी 2 तर ठाणे, कल्याण, औरंगाबाद, अहमदाबाद येथे प्रत्येकी 1 रूग्ण आहेत. या सार्‍यांवर सरकारी रूग्णालयात खास कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

ANI Tweet

महाराष्ट्रातील वाढती रूग्णांची संख्या पाहता आता तपासणी केंद्र वाढवण्याचा विचार केला जात आहे. मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलसह केईएममध्येही व्यवस्था केली जाणार आहे. सध्या कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता आता मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात उघडकीस आला आहे. तसेच याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत.