महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. त्यातच अफवांमुळे ही भीती अधिकच वाढते. अशीच एक अफवा पुण्यात पसरवण्यात आली. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आलेल्या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसवण्यात आली. राज्यात पुण्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सर्वाधिक असून या अफवेमुळे आधीच चिंतेत असलेल्या नागरिकांची चिंता नक्कीच वाढली. मात्र ही अफवा असल्याचे लक्षात आले आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात एकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाची अफवा पसरविल्याबद्दल पुण्यातील आणि राज्यातील गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल (रविवार, 15 मार्च) पत्रकार परिषदेत सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. तरी देखील मात्र पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. पोलिस तपासात हा मेसेज खोटा असल्याचे सिद्ध झाले आणि अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यक्तीचा शोध घेतला जाईल आणि त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Coronavirus च्या पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदीची शक्यता, आज होऊ शकते महत्वपूर्ण निर्णय)
राज्यात कोरोगाग्रस्त रुण्यांची संख्या 33 असून त्यापैकी 16 रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये, जिम, स्विमिंगपूल, मॉल्स, थिएटर्स बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच आजपासून पुण्यात जमावबंदी लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.