वर्क फ्रॉम होम साठी कॉर्पोरेट कंपन्या तयार; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सतर्क- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव महाराष्ट्रात वाढू लागला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून मुंबईत आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रातील नेत्यांची तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या दहशतीवर चर्चा झाली असून अनेक कॉर्पोरेट कंपन्या 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) साठी तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. तसंच सध्या आपण कोरोना व्हायरसच्या फेज 2 मध्ये असून आपल्याला फेज 3 पाहावा लागू नये, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (कोरोना व्हायरसबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलावली तात्काळ बैठक; कॉर्पोरेट आणि आरोग्य क्षेत्रातील नेत्यांशी चर्चा सुरु)

मुंबईतील 63 वर्षीय रुग्णाला 5 मार्च रोजी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुबईहून परतलेल्या या व्यक्तीला 13 मार्च पासून कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले. मात्र कोरोनामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला असे अद्याप सांगता येणार नाही. कारण त्या व्यक्तीला इतर अन्य आजारही होते, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. (कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम चालवण्याचे BMC चे खाजगी कंपन्यांना आदेश)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी यापूर्वीच 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा दिली होती. तसंच केवळ 50% कर्मचाऱ्यांना कामावर बोलवा, असे आदेश मुंबई महानगरपालिकेने खाजगी कंपन्यांना दिले आहेत. तसंच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.