सांगली मध्ये 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त; पालकमंत्री जयंत पाटील यांनी विलगीकरणाचा प्रयोग यशस्वीरित्या निभावलेल्या स्थानिकांचे मानले आभार
Representative Image (Photo Credits: twitter)

महाराष्ट्रामध्ये सुरूवातीच्या टप्प्यामध्ये सांगलीत एकाच कुटुंबात 23 पेक्षा अधिक लोकं कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या या भागात चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता सांगलीमधील 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त झाल्याच्या बातमीला सांगलीचे पालकमंत्री आणि इस्लामपूरचे लोकप्रतिनिधी जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे. सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग 100 टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. असं ट्वीट करत त्यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत मात्र यामुळे गाफील राहु नका अशी विनंतीदेखील त्यांनी नागरिकांना केली आहे.

सांगलीमध्ये सौदी अरेबियातून 13 मार्च रोजी भारतात दाखल झालेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांनादेखील कोरोनाने ग्रासले. त्यामुळे एकदम 26 जणांना कोरोची लागण झाल्याने सांगली जिल्हा हादरला होता. मात्र आता सांगलीची वाटचाल कोरोनामुक्त जिल्ह्याकडे होत आहे. Coronaviru In Maharashtra: covidyoddha@gmail.com इमेल आयडीवर तांत्रिक समस्येचे निराकरण; इच्छुक डॉक्टरांसह, प्रशिक्षित मेडिकल कर्मचाऱ्यांना पुन्हा माहिती पाठवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटच्या माध्यमातून आवाहन.  

जयंत पाटील यांचं ट्वीट  

 

सांगलीमध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जयंत पाटील तेथे दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ कोरोनाबाधित कुटुंबाच्या आजुबाजूचा भाग सील करून गावातील नागरिकांच्या संचारबंदीवर कडक नियम लावले. सुदैवाने सांगलीतील सारे रूग्ण हे एकाच कुटुंबात असल्याने त्याचा प्रसार इतर ठिकाणी झाला नव्हता. सध्या राज्यात या इस्लामपूर पॅटर्नचंदेखील कौतुक होत आहे. सांगली कोरोनामुक्त होत असलं तरीही अद्याप महाराष्ट्रातील मुंबई शहराला असलेला कोरोनाचा विळखा सुटला नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.