Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांचा महत्वाचा निर्णय; कोरोना व्हायरस संक्रमित पोलिसांना उपचारांसाठी अ‍ॅडव्हान्समध्ये देणार 1 लाख रुपये
Maharashtra Police (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कोरोना व्हायरसने (Coronavirus) संक्रमित झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मदत म्हणून, 1 लाख रुपयांची रक्कम अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) संजीव कुमार सिंघल (Sanjiv Kumar Singhal) यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केला. त्यात ते म्हणतात, 'कोरोना व्हायरस या आजाराचा कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्यास, त्याला पोलिस कल्याण निधीतून तत्काळ 1 लाख रुपये मंजूर करावे.' असे निर्देश सर्व युनिट कमांडर्सना देण्यात आले आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी याआधी पार पडलेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान, युनिट कमांडर्सना यासाठीच्या मौखिक सूचना दिल्या होत्या. राज्यात आठ अधिकाऱ्यांसह किमान 37 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील बहुतेक पोलिस कर्मचारी मुंबईतील आहेत आणि लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावत असताना ते कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 20,000 अधिकाऱ्यांसह सुमारे 2.2 लाख कर्मचारी आहेत. (हेही वाचा: 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत 11 पोलीस अधिकाऱ्यांसह 38 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; महाराष्ट्र पोलिसांची माहिती)

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघालेल्या नागरिकांची पोलिसांनी चक्क केली 'आरती' ; पाहा व्हिडिओ - Watch Video

दुसरीकडे कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 60,005 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 13,381 जणांना अटकही करण्यात आली आहे. आज (मंगळवार, 21 एप्रिल 2020) सकाळी 10 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात नवे 472 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरस बाधित एकूण रुग्णांची संख्या 4676 इतकी वाढली आहे.