कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्र आणि देशात आपला प्रादुर्भाव वाढवताना दिसतो आहे. एकट्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधिक रुग्णांची संख्या 101 इतकी झाली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 446 वर पोहोचली आहे. सांगली येथे काल कोरोना व्हायरस बाधित 4 रुग्ण सापडले. तर आजही पुणे येथे 3 तर सातारा येथे एक नवा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटाचे सावट आता अधिकच गडद झाले आहे.
देशातील एकूण स्थितीचा विचार करता कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे. त्यानंतर केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळ राज्यातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 60 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस संकट आता अधिक गरिरे होऊ नये यासाठी देशभरातील जवळपास 20 शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब, दिल्ली आणि इतरही काही राज्यांमध्ये संचारबंधी लागू करण्यात आली आहे.
दिलासादायक वृत्त
मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक वृत्तही आले आहे. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे डॉक्टर आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बाराही रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांची कोरोना चाचणी आता निगेटीव्ह आली आहे. (हेही वाचा, Coronavirus: पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा)
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेला गर्दी करु नका असे अवाहन केले आहे. राज्यातील जनतेने सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे. हे सर्व जे काही सुरु आहे ते कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे तर आपण सर्वांसाठीच सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत गर्दी टाळावी. गर्दी टाळून नागरिकांनी सहकार्य करावे. जेणेकरुन सरकारला अधिक कठोर पाऊल टाकावे लागू नये, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. ते आज सकाळी एका वृत्तवाहीणीशी बोलत होते.