Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोत्तपरी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) येथील महिपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महत्वपूर्ण  घोषणा केली आहे. नाशिक येथील सार्वजनिक ठिकाणी आता विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून 200 रुपयांचा दंड आकारला जाईल, असे आदेश त्यांनी दिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक असताना अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. यामुळे अशा नागरिकांना अद्दल घडावी म्हणून नाशिक महापालिकेने नवी शक्कल लढवली आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणताही व्यक्ती विनामास्क दिसल्यास, त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार, असा आदेश महापालिका आयुक्तांनी दिली आहे. नाशिक येथे आतापर्यंत 2 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Covid 19 Updates Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात आज 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद, 178 मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूने महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना राज्यात आज मोठ्या संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 5 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.