Coronavirus: बारामती येथे लॉकडाउनच्या काळात नियम मोडणाऱ्या तीन जणांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रासह देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून सरकारच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. परिणामी आता पोलिसांना नियमाच्या विरोधात वागणाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभुमीवर बारामती येथे सुद्धा लॉकडाउनच्या काळात नियम मोडणाऱ्या तीन जणांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी ही बारामती येथे लॉकडाउनच्या काळात बेजबाबदारपणे वागल्याने बहुतांश जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांना आता कोर्टाने तुरुंगवास आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगितली आहे.

बारामती पोलीस स्थानकातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घरीच थांबा असे सांगितले तरीही ऐकत नाही आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने शिक्षा सुनावली असून तीन दिवस तुरुंगावासासह 500 रुपये दंड भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमांचे उल्लंघन करत असल्यास जागरुक व्हा. कारण एकदा तुमच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे तुम्हाला एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो.(Coronavirus: मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या कोरोना व्हायरस बाधित 56 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 320 वर जाऊन पोहचला तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेजबाबदार पणे वागणाऱ्यांच्या आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना दिला आहे.