Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण संख्या 25,922 तर आतापर्यंत 5,547 जणांना डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या 25, 922 इतकी झाली आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने आतापर्यंत 5,547 रुग्णांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी आज (बुधवार, 13 मे 2020) मालेगावर शहराला भेट दिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरस संक्रमित 495 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना व्हयरस संक्रमित 54 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित मृतांचा आकडा 975 इतका झाला आहे.

या वेळी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, मालेगाव आणि औरंगाबाद येथे सरकारने मायक्रो प्लॅनिंग केले. त्यामुळे मालेगावमधून 250 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मालेगावबाबत चिंता बाळगण्याचे कारण नाही. मालेगावची स्थिती हाताबाहेर अजिबात गेली नाही. आवश्यक त्या सर्व बाबी मालेगावमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिंता करुन नये, असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे या वेळी म्हणाले. (हेही वाचा,BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 66 नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत 1 हजार 028 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग तर, 40 जणांचा मृत्यू )

एएनआय ट्विट

पुढे बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, नाशिक येथील 18 पोलीस आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमनमुक्त झाले आहेत. राज्याबाबत बोलायचे तर आतापर्यंत 55 लाख नागरिकांचे सर्विलन्स करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर घटला आहे. राज्यात या आधी मृत्यूदर 7 इतका होता. त्यात घट होऊन तो 3.7 इतक्या खाली आला आहे. यासोबतच राज्यातील कोरोना रुग्णांचा डब्लिंग रेटही मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.