Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 1273 कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित; 11 जणांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलिसांतील 1373 जणांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. त्यात नव्याने नोंद झालेल्या कोरोना संक्रमित 131 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. एकूण संक्रमितांपैकी 291 पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत 11 पोलीसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांबाबत बोलायचे तर, राज्यात आतापर्यंत कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 33053 इतकी झाली आहे. त्यातील 24167 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कोरोना व्हायरस संक्रमित 1198 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरना संक्रमित रुग्णांवर उपचार केल्यामुळे प्रकृती सुधारलेल्या आणि बरे वाटू लागलेल्या 7688 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

देशाचा विचार करता देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 96169 इतकी आहे. त्यातील 56316 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरना संक्रमित रुग्णांवर उपचार केल्यामुळे प्रकृती सुधारलेल्या आणि बरे वाटू लागलेल्या 36824 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.