Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai)  एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका खाजगी रुग्णालयात 68 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, या रुग्णाने फिलिपिन्स (Philippines) मधून प्रवास केला होता, त्याला कोरोना सोबतच अन्यही अनेक आजार होते, परिणामी लागण झाल्याचे स्पष्ट होण्याआधीच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या रुग्णाला मागील काही दिवस व्हेंटिलेटर वर सुद्धा ठेवण्यात आले होते, मात्र आज, 23 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे, यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयात एका 74 वर्षीय वृद्धाचा व त्यापाठोपाठ एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता.

ANI च्या माहितीनुसार, या रुग्णाची प्राथमिक चाचणी ही कोरोना पॉझिटिव्ह होती ज्यानुसार त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र काही दिवसांनी टॅप्सनी केली असता त्यांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह दाखवण्यात आले, यानंतर त्यांना कस्तुरबा येथून एका खाजगी रुग्णलयात हलवण्यात आले. मात्र त्यानंतर आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा मृत्यू नेमका कोरोनामुळेच झालाय का याबाबत प्रश्न आहे.

ANI ट्विट

दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा मागील काही तासात पुन्हा वाढला आहे. आज सोमवार, 23 मार्च रोजी कोरोनाच्या नव्या 15 रुग्णांची यात भर पडली आहे. या 15 पैकी 14 नवे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत, तर एक रुग्ण हा पुण्याचा आहे. यामुळे सद्य घडीला महाराष्ट्रात तब्बल 89 कोरोनाचे रुग्ण आहेत.  महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आजपासून लॉक डाऊन चे आदेश देण्यात आले आहेत, यानुसार, कलम 144 जमावबंदी आणि संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी ओसरताना दिसत नाहीये. नागरिकांनी सरकारचे आदेश गांभीर्याने पाळावेत अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही टोपे यांनी दिला आहे.