Mumbai Metro | Photo Credits: Twitter/ Mumbai Metro

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आल्यानंतर, सार्वजनिक वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला होता. रेल्वे, मेट्रो, बस सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर अनलॉक अंतर्गत ही सेवा काही क्षमतेने पुन्हा सुरु करण्यात आली. याचा पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (VAG) कॉरिडॉरवरील मेट्रो सेवा (Metro Services) सोमवारपासून 200 वरून 230 पर्यंत वाढणार आहे. लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रो (Mumbai Metro) वन जवळपास सात महिन्यांच्या कालावधीनंतर ऑक्टोबरपासून पुन्हा सेवा सुरू केली.

सूत्रांनी सांगितले की, 'आठवड्याच्या दिवसात प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या संख्या सुमारे 70,000 झाली आहे. त्यामुळे सेवांची संख्याही वाढविण्यात येईल. शिवाय प्रवाशांना सहज स्टेशन बाहेर पडता यावे यासाठी स्थानकांवर अधिक एन्ट्री/एक्झिट गेट उघडण्यात येतील.' 18 जानेवारीपासून मुंबई मेट्रो वनचे ऑपरेटिंग तासही वाढविण्यात येणार आहेत.

नव्या वेळेनुसार आता वर्सोवाहून पहिली रेल्वे सकाळी 7.50 वाजता आणि घाटकोपर येथून सकाळी 8.15 वाजता सुटेल. तसेच घाटकोपर येथून शेवटची ट्रेन रात्री 10.15 वाजता व वर्सोवा येथून रात्री 9.50 वाजता सुटेल. पूर्वीच्या सेवा सकाळी 8.30 ते संध्याकाळी 8.30 या वेळेत होत्या. याव्यतिरिक्त, मुंबई मेट्रो वन साकी नाका, मरोल नाका, चकाला/जेबी नगर आणि डब्ल्यूईएच मेट्रो स्टेशनच्या दोन्ही टोकांवर गेट उघडणार जाणार आहे. पहिली ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिट आधी स्थानके उघडली जातील. (हेही वाचा: Schools Reopen in Mumbai & Thane: मुंबई, ठाणे येथील शाळा 18 जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता)

दरम्यान, यामध्ये अजून एक दिलासादायक बाब म्हणजे, 2 ए (दहिसर-डीएन नगर) आणि 7 (दहिसर ई-अंधेरी ई) हे दोन मेट्रो मार्ग 2021 मध्ये सुरू होतील, अशी पुष्टी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आरए राजीव यांनी केली. या दोन्ही मार्गांची कामे डिसेंबरमध्ये होणे अपेक्षित होते, मात्र कोरोनामुळे त्यात उशीर झाला.