महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेसचेच सरकार येणार, कॉंग्रेसच एक नंबरचा पक्ष राहणार- प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच Nana Patole यांनी व्यक्त केला विश्वास
Nana Patole | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष (State Congress President) नाना पटोले (Nana Patole) यांनी एका आठवड्यानंतर शुक्रवारी औपचारिकपणे आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात पटोले यांनी पदभार स्वीकारला. 5 फेब्रुवारी रोजी बाळासाहेब थोरात यांच्या जागी कॉंग्रेसने नाना पटोले यांची पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी नाना पटोले यांनी यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच ट्रॅक्टर रॅली काढून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला.

पटोले यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी बाळासाहेब थोरात यांची जागा घेतली आहे, जे सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत रॅली काढली. यावेळी ते म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमाबाबत जनतेमध्ये उत्साह आहे. या उत्साहाच्या माध्यमातून परिवर्तनाची लहर सुरु झाली आहे. पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेसचेच सरकार येणार, कॉंग्रेसचच एक नंबरचा पक्ष राहील आणि देशामध्येही कॉंग्रेसचेच सरकर येणार.’

ते पुढे म्हणाले, ‘ज्या पद्धतीने गेल्या सहा वर्षांमध्ये केंद्रातील सरकारने महागाई वाढवली, ज्याप्रकारे सामान्य नागरिकांचे बजेट बिघडवले, लोकांचे खिशे कापले, पेट्रोल-डीझेलचे दर वाढवले त्याबाबतचा संदेश आजच्या कार्यक्रमामधून आम्ही देत आहोत.’ (हेही वाचा: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र)

ट्रॅक्टर रॅलीबाबत भाष्य करताना ते म्हणाले, ‘आपण पाहिलेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, त्यांची चेष्टा केली. गेले अडीच महिने शेतकरी तीन काळे कायदे रद्द व्हावेत म्हणून आंदोलन करीत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत. आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. भाजपने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली आहे त्याला उत्तर म्हणून ही रॅली काढली जात आहे. नरेंद मोदी यांना ते कायदे रद्द करावे लागतील हाच संदेश आम्ही देत आहोत.’