Cyclone Tauktae: 'कर्ज घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा'; नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन
Nana Patole (Photo Credits-ANI)

तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) कोकण दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. "वेळ पडल्यास कर्ज घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा", असं ते म्हणाले. त्याचबरोबर कोकणात खूप मोठं नुकसान झालं असून नुकसानग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही तरी राज्य सरकारनं वेळ पडल्यास कर्ज घेऊन कोकणवासियांना करावी, असं पटोले म्हणाले.

यावेळी नाना पटोले यांनी भाजपला देखील लक्ष्य केले. ही वेळ राजकारण करण्याची नाही. मात्र भाजपनं गलिच्छ राजकारण सुरु केलं आहे. लोकांना मदत कशी करता येईल, यावर लक्ष द्यायला हवं. नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्याला केंद्राकडून मदत मिळायलाच हवी. हा राज्याचा संवैधानिक अधिकार असून केंद्राच्या तिजोरीत राज्याचा देखील 40 टक्के हिस्सा असतो, असं पटोले म्हणाले.

Nana Patole Tweet:

(हे ही वाचा: केंद्र सरकारने खतांबाबत दरवाढ मागे घेतली नाही तर पुढच्या आठवड्यापासून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येईल- नाना पटोले)

नाना पटोले सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांच्या समस्याही ऐकून घेतल्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील कोकणातील नुकसानग्रस्त भागांची पाहाणी करत लवकरच मदत जाहीर करु असे आश्वासन दिले आहे.