कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Photo Credit-PTI)

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) येत्या एप्रिल-मेमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप (BJP), कॉंग्रेस (Congress) आणि इतर पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सध्या देशात असणारी मोदीविरोधी लाट पाहता कॉंग्रेससाठी ही फार महत्वाची निवडणूक असणार आहे यात काही शंका नाही. अशात आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) 1 मार्च रोजी धुळ्यात प्रचारसभा घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे या सभेत कॉंग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अशातच कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी-कॉंग्रेसने (NCP) महाआघाडी घोषित केली आहे. भाजप विरोधात हे दोन्ही पक्ष एकत्र येत, या महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवार दि. 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हेही सहभागी होणार आहेत. (हेही वाचा : मोदी समर्थकांची बदलती ‘सूरत’; कपडा व्यापाऱ्यांच्या बिलावरही प्रचारासाठी ‘नमो नमो’)

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात प्रचार सभा घेतली होती, तिथूनच आता कॉंग्रेस आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. नंदुरबार, जळगाव इथले कार्यकर्तेही या प्रचारसभेत सहभागी होऊ शकतात अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत अजून तरी अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे.