Self-Styled Godman Dhirendra Shastri Alias Bageshwar Dham Sarkar. (Photo Credits: ANI)

बागेश्वर धाम (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) पाठिमागील काही दिवसांपासून देशात वाद आणि चर्चेचे कारण ठरले आहेत. याच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबई होऊ घातला आहे. ज्याला महाराष्ट्र काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतील कार्यक्रमास परवानगी देऊ नये. यासाठी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहीले आहे. बाबा बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम या आधी नागपूर येथे झाला होता. त्याही कार्यक्रमावेळी मोठा वाद झाला होता. त्यांच्या कार्यक्रमाला आता काँग्रेसने विरोध केल्याने पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे देशभरातील विविध शहरांमध्ये सत्संगचे कार्यक्रम करत आहेत. भारत हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी त्यांनी अभीयान सुरु केले आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत येत्या 19 आणि 19 मार्च रोजी आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमास काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. सरकारने या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी काँग्रेसची मागणी आहे. (हेही वाचा, Fact Check: ऐश्वर्या राय बच्चन, आराध्यासोबत बागेश्वर धाम सरकार उर्फ ​​धीरेंद्र शास्त्रींना भेटली होती का? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य खोटे दावे)

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईला लागून असलेल्या मीरा-भायंदर परिसरात बाबा बागेश्वर धाम यांचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये. येत्या 18 आणि 19 मार्च रोजी या ठिकाणी सलग दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम होणार आहे.

नाना पटोले यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र हे विचारांनी प्रगत असलेले राज्य आहे. अशा वेळी समाजात अंधश्रद्धा पसरवणारे संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या बाबा बागेश्वर यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये. जर धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला इथे परवानगी दिली तर ते जनतेला संभ्रमीत करुन त्यांच्या भावना आणि श्रद्धा यांच्याशी प्रतारणा होईल, असेही पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. कृपा करुन या कार्यक्रमास परवानगी दिली जाऊ नये, असे पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

ट्विट

कोण आहेत धीरेंद्र शास्त्री?

बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील स्वयंभू धर्मगुरू आहेत. ते मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम मंदिराचे प्रमुख आहेत. त्यांना अलौकीक बुद्धी आणि आफाट क्षमता प्राप्त झाल्याचा विश्वास त्यांच्या चाहत्यांना वाटतो. अनेकदा ते त्यांच्या विविध वक्तव्यामुळे वादात आडकतात. त्यांच्या विचारांपेक्षा त्यांंची विधाने आणि वक्तवेच अधिक चर्चेत असतात.