माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या पत्राप्रकरणी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण केलं जात आहे ते ज्या राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता आहे त्या ठिकाणी केलं जातं. विरोधकांचे सरकार टीकू न देण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची भाजपची तयारी असते. याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला आला आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर काँग्रेसने प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली.
'येन केन' प्रकारे सत्ता मिळण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो. सुशांतसिंह राजपूत, साधू प्रकरणातही मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली. आजकाल 'मोदी मीडिया' तयार झालाय. एका अधिकाऱ्याने पत्र लिहिल्यावर तथ्य जाणून न घेता महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या अजेंड्यावर मीडियाचा एक भाग चालतो, ही वस्तुस्थिती आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. षडयंत्र रचणं ही भाजपची ताकद आहे, असंही ते म्हणाले. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे)
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवणं हे देशात पहिल्यांदाच होत नाही, असेही ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी गुजरातमधील घटनांची आठवण करुन दिली. 2012 मध्ये आयपीएस वंजारा यांनी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांना देखील पोलिस दलात पुन्हा घेण्यात आलं होतं. आयपीएस संजीव भट्ट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Param Bir Singh's Letter प्रकरणावर संजय राऊत यांचा सरकारला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला)
भारतीय जनता पक्षाचे स्वत:करता एक आणि दुसऱ्याकरता एक असे दोन मापदंड आहेत. विरोधक अत्यंत बेजबाबदारपणे काम करत आहेत. त्यामुळे माध्यमांनी तर्क काढून न्यायव्यवस्थचं काम करु नये. त्यापूर्वी त्यामागील सत्य जाणून घेतलं पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणही त्यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, सरकारने कोणत्याही दबावात येऊ नये. कारण अशाप्रकारचा मोदी मीडियाचा प्रभाव आणि भाजपकडून त्याचा वापर हे यापूर्वी अनुभवलं आहे, असेही त्यांनी सांगितले.