उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर गाडीत सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे प्रकरण आणि आता परम बीर सिंह (Param Bir Singh) यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र या घटना एकामागोमाग समोर येत गेल्या. त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच चिघळत चालले असून वेगवेगळी वळणं घ्यायला लागले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेच सचिन वाझे (Sachin Waze) यांचे गॉडफादर असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. मिडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
परमबीर सिंह यांचा रोख केवळ गृहमंत्र्यांवर नसून त्यांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगत नारायण राणे म्हणाले की, सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणले आणि कोणत्याही नवीन प्रकरणाचा तपास त्यांनाच द्यावा असाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. गेले काही महिने सचिन वाझे कधी वर्षावर तर कधी ओबेरॉय मध्ये राहत असल्याचंही नारायण राणे म्हणाले.हेदेखील वाचा- Param Bir Singh's Letter प्रकरणावर राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल; कसून चौकशी करण्याची केंद्राला विनंती
परमबीर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा सवालही नारायण राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्रीच सचिन वाझेचे गॉडफादर असून मनसुख हिरण याच्या सारख्या निरपराधाला मारण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नको पण पहिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.
"राज्यात लोकांचे प्रश्न मागे राहिलेत, शेतकरी , कामगार आणि इतर प्रश्नही मागे राहिलेत. पैसे द्या आणि मुडदे पाडा असं या राज्यात सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काळीमा फासलाय. मागच्या इतिहासात असा मुख्यमंत्री झाला नाही. सचिन वाझेंनी आतापर्यंत कुणासाठी एन्काऊंटर केलेत याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे राज्यामध्ये असा मुख्यमंत्री आणि असा गृहमंत्री असू नये असं मला स्पष्टपणे वाटतं." असेही ते पुढे म्हणाले.