Param Bir Singh's Letter प्रकरणावर राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल; कसून चौकशी करण्याची केंद्राला विनंती
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या पत्राप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) हल्लाबोल चढवला. तसंच या प्रकरणाची महाराष्ट्रात चौकशी  होऊ शकत नाही. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करुन याची कसून चौकशी करावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जनतेचा प्रशासन, सरकार आणि पोलिसांवरुन विश्वास उडेल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

परमबीर सिंह यांनी गृहखात्यावर केलेले आरोप ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांची कसून चौकशी व्हायला हवी. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणं ही क्षुल्लक गोष्ट नसल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, त्यांनी दिला नाही तर तो घ्यायला हवा. असंही ते म्हणाले. (Param Bir Singh's Letter प्रकरणावर संजय राऊत यांचा सरकारला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला)

सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत. कोणताही पोलिस अधिकारी कोणी सांगितल्याशिवाय कुठेही बॉम्ब प्लॅंट करणार नाही. तसंच बॉम्बसोबत गाडीत सापडलेलं धमकीपर पत्रही हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे काढणं इतकं सोपं नाही. मग यामागे नक्की हेतू काय? हे शोधून काढणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे या प्रकरणाला कोणतेही फाटे न फोडता अंबानी यांच्या घराखाली गाडी कोणी ठेवली, याची प्रथम चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, "केंद्राने चौकशी केल्यावर कल्पेनेबाहेरचे चेहरे समोर येतील. फटाक्यांची माळ लागेल."

राष्ट्रपती लागवट लागू करुन या प्रकरणाचा तपास लागणार नाही. या राजकीय गोष्टी आहेत. मुळात या घटनेची चौकशी होणं यातून आरोपींचा शोध लागणं महत्त्वाचं आहे. हे प्रकरण भरकटून चालणार नाही. त्यामुळे याची केंद्र स्तरीय चौकशी करण्याची विनंती त्यांनी वारंवार केली आहे.