IPS Officer Krishna Prakash: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा दणका, पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक निलंबीत; आरोपींना जामीन देण्यासाठी कलम कमी केल्याचा आरोप
Pimpri Chinchwad Police | (File Photo)

आरोपींना जामीन मिळावा यासाठी दाखल गुन्ह्यातील कलम कमी करणे आणि तपासात हालगर्जीपणा असा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांनी दोन दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यापैकी एकजण गुन्हे पोलीस निरीक्षक (Crime Police Inspector) तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) आहे. या अधिकऱ्यांची नावे अनुक्रमे निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि एस.एस. जाधव अशी आहेत. कृष्णप्रकाश यांच्या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात एकच चर्चा सुरु झाली आहे.

प्राप्त माहिती अशी की, पिंपरी येथे वाहन तोडफोड गुन्ह्यात एका आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. आरोपीला जामीन मिळावा यासाठी गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव यांनी अप्रत्यक्ष मदत केली. गुन्हेगारावर असलेले गंभीर कलम हटवले व तपासात हालगर्जीपणा केला असा या दोन्ही अधिकाऱ्यांवर ठपका आहे. गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी न्यायालयात आरोपींचे कलम कमी करावी यासाठी एक अहवाल सादर केला. परिणामी आरोपींची जामीनावर सुटका झाली, असा आरोप आहे.

दुसऱ्या बाजूला आणखी एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव यांनीही दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन मिळावा यासाठी त्याच्यावर किरकोळ कलमं लावली. तसेच, त्याबाबतचा अहवालही न्यायालयाला सादर केला. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे लेखी खुलासा मागवला होता. या खुलाशानंतर झालेल्या चौकशीत ते दोशी आढळले. त्यावरुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.