महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन युनिटला (ST Mahamandal) तात्काळ 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी, 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून, उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार थकल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास सुरुवात केली. मागील वर्षीही जळगावात कंडक्टर मनोज चौधरी आणि रत्नागिरीतील पांडुरंग गडदे या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. एसटी कर्मचारी बेडसे यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिले होते की, पगार न मिळाल्याने ते आत्महत्या करीत आहेत. या सर्व घटनांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.
या रकमेच्या वितरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासह महामंडळाच्या आर्थिक समस्या सोडविण्यास मदत होईल, असा उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती कार्यरत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. (हेही वाचा: महाराष्ट्रात Liquor Chocolates वर बंदी; घरात बाळगली असतील व्हा सावध, कदाचित होऊ शकते अटक)
आर्थिक संकटामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. यामुळे ते खूप चिडले आहेत. सोमवारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील डेपोबाहेर दुपारी 3 ते 5 या वेळेत आंदोलन केले होते. कोरोना काळात एसटी सेवा बंद झाल्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही.