महाराष्ट्रात मद्यपान करण्यावर किंवा घरात दारू (Liquor) ठेवण्यावर कोणतेही बंधन नाही. परंतु जर तुम्ही दारूपासून बनवलेली चॉकलेट्स (Liquor Chocolates) घरी ठेवली किंवा ती बनवली तर तुम्हाला अटक होऊ शकते. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस अनेक किलो दारू असलेली चॉकलेट जप्त करतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून 46.5 किलो वजनाचे आयात केलेले दारू चॉकलेट जप्त केले, त्याची किंमत 4.31 लाख सांगितली जात आहे.
23 ऑगस्ट 2021 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे आणि प्रसाद सस्तूरकर यांच्या पथकाने एका दुकानावर छापा टाकला. तेथे डेन्मार्कमधून आयात केलेली अल्कोहोलयुक्त चॉकलेट विकली जात होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्याची राज्य उत्पादन आणि प्रतिबंधात्मक व्यवस्था अल्कोहोल चॉकलेटचे उत्पादन, विक्री आणि बाळगण्याची परवानगी देत नाही. अशा चॉकलेटचा वापर अल्पवयीन मुलांकडून होण्याचा धोका आहे.
डिसेंबर 2019 मध्ये, क्रॉफर्ड मार्केटवर अशाच छाप्यामुळे 18,000 किंमतीचे अल्कोहोल चॉकलेट जप्त करण्यात आले होते. 2012 मध्ये वरळी येथील प्रीती चंद्रायणी या 53 वर्षीय चॉकलेटियरला, घरी दारू असलेले चॉकलेट बनवल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले. चंद्रायणीला विनापरवाना अल्कोहोलच्या सुमारे 20 बाटल्या आणि चॉकलेटचे बॉक्स बाळगल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. (हेही वाचा: Mumbai Property Registration: मुंबई बीएमसी क्षेत्रात घर विक्रीत वाढ सुरू, नाइट फ्रँक इंडियाने दिली माहिती)
महाराष्ट्रात भारतातील सर्वात कडक अबकारी आणि प्रतिबंधात्मक व्यवस्था आहे. विशेष परमिट आणि परवाना नियम, 1952 मध्ये लिकर चॉकलेटच्या निर्मितीचे प्रावधान होते. 1980 च्या दशकाच्या मध्यावर यासाठी धोरण ठरवले गेले. मात्र, नंतर ते पुढे ढकलण्यात आले. महाराष्ट्रात 1949 ते 1960 पर्यंत दारूबंदी लागू होती, यामुळे राज्यात अवैध दारू तस्करी सुरू झाली. महाराष्ट्रातील दोन जिल्हे- वर्धा आणि गडचिरोली येथे पूर्णतः दारूबंदी आहे. चंद्रपूरमधील बंदी यावर्षी उठवण्यात आली.