Samruddhi Highway (Photo Credits: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची (Samruddhi Highway) पाहणी केली. अनेक जिल्ह्यांना जोडणा-या या महामार्गाचे काम कशा पद्धतीने सुरु आहे याबाबत त्यांनी पाहणी केली. यावेळी "या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे या महामार्गाचे काम सुरु आहे" अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

येत्या 1 मे 2021 पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या 1 मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू असेही त्यांनी यावेळी सांगितले. "आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या 1 मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू" असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.हेदेखील वाचा- हेदेखील प्रत्येकाने आघाडी धर्म पाळायला हवा; शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यावर यशोमती ठाकूरांचे ट्विट

सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.

समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यात नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई यांचा समावेश आहे.