Irrfan Khan Dies: इरफान खान याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली;  ट्विट करत व्यक्त केल्या भावना
CM Uddhav Thackeray & Irrfan Khan (Photo Credits: Facebook/Instagram)

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईत निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी कोकिलाबेन धीरुबाई रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ट्विटच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील इरफान खान याच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. "अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (इरफान खान यांच्या निधनावर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे यांच्या सहित 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक)

ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले की, "इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल. दुर्धर अशा कॅन्सर आजारातही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असताना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली." 

 मुख्यमंत्र्यांचे ट्विट:

काही दिवसांपूर्वी इरफान खान याची आई साईदा बेगम यांचे निधन झाले होते. मात्र परंतु, या दुःखद परिस्थितीही त्याला लॉकडाऊनमुळे आपल्या आईचे अत्यंदर्शन घेता आले नव्हते. 'लंच बाक्स', 'हिंदी मिडीयम', 'लाईफ ऑफ पाई', 'पिकू', 'मकबूल' यांसारख्या दर्जेदार सिनेमात इरफान खान याने काम केले होते.