महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने (Heavy Rains) धुमाकूळ घातला आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत, फळबागा उध्वस्त झाल्या आहेत, घरांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उस्मानाबादचा (Osmanabad) दौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याला भेट देतील.
या दौऱ्यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम –
स. 9.30 वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण, स. 10.15 वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
स. 10.15 वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. स. 11.15 वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
स. 11.45 वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
दुपारी 13.30 वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागताच्या भेटी राखीव. या भेटी दु. 1.ते 1.45 या वेळेत होतील.
त्यानंतर, दु. 1.45 वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व 3.30 वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण. (हेही वाचा: केंद्र सरकारकडे मदत मागण्यात गैर काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सवाल)
परतीच्या पावसाने राज्यात सर्वांनाच झोडपले आहे. अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून, नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौ-यावर आहेत. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला व उद्या मराठवाड्याचा दौरा करतील.