Shiv Sena Dasara Melava 2020: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्याचा कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात निशाणा
CM Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

Shiv Sena Dasara Melava 2020: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची, असा निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात साधला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्रात मुंबई पोलिस हे निक्कमे आहेत, असा उदो-उदो करण्यात आला. मुंबई किंवा महाराष्ट्रात गांजा पिकत नाही. राज्यातील सर्व घरात तुळशी वृंदावन आहेत, गांज्याची नव्हे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.

जे लोक महाराष्ट्रावर आणि मुंबईवर आरोप करत आहेत, त्यांच्या राज्यात कदाचित गांज्याची लागवड केली जात असेल. गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी आमच्यावर तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्या. आता ढेकर देऊन गप्प बसा. कारण आमचं कोणीचं काही बिघडू शकत नाही, असा दावादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा - Shiv Sena Dasara Melava 2020: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शाब्दिक फटकेबाजी; BJP वर कडाडून टीका, कंगना रनौत, सुशांतसिंह राजपूत, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत केले भाष्य)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंगना रनौतवर जहरी टीका करताना म्हणाले की, ‘अनेकजण बाहेर काम मिळत नाही, म्हणून मुंबईत येतात आणि इथल्या मिठाशी गद्दारी करता. मुंबईची बदनामी करण्यासाठी हे लोक गांजा, चरस पितात. आणि हेच लोक मुंबईत शासन व्यवस्था नाही, असं ओरडतात. तसेच मुंबईचा उल्लेख पाक व्याप्त काश्मीर असा करतात. मात्र, हे पंतप्रधानांचं मोठं अपयश आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मात्र, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काही असतं, तर ते मुंबई पोलिसांनी नक्की शोधून काढलं असतं. या प्रकरणावरून महाराष्ट्राची आणि मुंबईची प्रचंड बदनामी करण्यात आली.