CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

आज 1 जानेवारी 2021. 2020 चं कठीण वर्ष संपवून आपण नव्या वर्षात पर्दापण केलं आहे. मागील वर्षात अनुभवलेला कठीण काळामुळे नव्या वर्षाकडून सर्वांच्याच खूप आशा आहेत. आपण सर्वचजण नव्या वर्षाकडे सकारात्मकतेने पाहत आहोत. तसंच शुभेच्छांचा वर्षावही करत आहोत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील एका पत्राद्वारे राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तचा निर्धार करण्याचा संदेशही त्यांनी दिला आहे. तसंच वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पुढे त्यांनी लिहिले की, मागील वर्षभर जगाने कोरोनाशी लढा दिला. महाराष्ट्रातील लोकांनी देखील अत्यंत जबाबदारीने ही लढाई लढली. आता कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असला तरी बेसावध न होता स्वत:सोबत कुटुंबियांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसुत्री पाळणे गरजेचे आहे. (कोविड-19 ची लस घेतली तरी पुढील 6 महिने मास्क घालणे अनिवार्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

मुख्यमंत्र्यांचे पत्र:

तसंच वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण याचा आपण अधिक नाविन्यपूर्ण उपयोग करत आहोत. दरम्यान, पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधणे अवघड असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या बदललेल्या रुपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

टप्प्याटप्प्याने सुरु केलेल्या सुविधा पुन्हा बंद करायच्या नाहीयेत. मात्र कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नियम आणि कायद्यांपेक्षा स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नव्या पिढीने नवर्षात सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करावा, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

आपल्यापुढील आव्हाने कमी होणार नाहीत. मात्र शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिक संकटे नेहमीच येतात. मात्र त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुया, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात देवदूत ठरलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस, शासकीय आणि पालिका कर्मचाऱ्यांना तसंच स्वयंसेवकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासही ते विसरले नाहीत.