CM Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (20 डिसेंबर) फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांना हात घातला. विकास कामं, शिक्षण, कोरोना व्हायरस संकट, कोविड-19 लस या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. मेट्रो कारशेड बद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच केंद्राने आणि राज्याने सहमताने वाद सोडवायला हवा, असेही ते म्हणाले. तसंच लस घेतली तरी त्यापुढील 6 महिने मास्क घालणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युके आणि युरोप मध्ये व्हायरसने आपले रुप बदले असल्याने कोविड-19 व्हायरस आता अधिक वेगाने पसरत आहे. या कारणामुळे युके आणि युरोप मध्ये टायर 4 चा लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. तसंच बाहेरील देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोविड टेस्ट सुरुच राहणार आहेत.

राज्यात अजूनही 20-25 टक्के लोक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क घालणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर लग्नसोहळ्यात मज्जा-मस्ती करताना नियम धाब्यावर बसवून चालणार नाहीत, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने कोविड-19 सारखी बिकट परिस्थिती सावरत आणि राजकीय हल्ले परतवत एक वर्ष पूर्ण केलं आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार पडण्याची वाट पाहणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. (CM Uddhav Thackeray Abhinanadan Mulakhat: केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, कुटुंबावरील वरील आरोप ते सत्तांतराचे प्रयत्न यावर काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?)

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. 1 मे पर्यंत नागपूर ते शिर्डी पर्यंतची वाहतूक सुरु करत आहोत. सिंधुदूर्ग येथील विमानतळही जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येईल, अशी आश्वासनंही त्यांनी जनतेला दिली. आर्थिक संकट, केंद्राची धीम्या गतीने येणारी मदत या सर्व परिस्थितीत आपण आत्मविश्वाने पाऊल पुढे टाकत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी करण्यास आपल्याला यश आले तर शाळा आपण अगदी सहज सुरु करु शकतो. दरम्यान, आज मुख्यमंत्री मुंबई लोकल बद्दल काही घोषणा करतील अशी आशा असताना मात्र लोकलबद्दल मात्र त्यांनी आजही मौन बाळगले.

मला माझ्या खुर्चीचे महत्त्व जाणतो. तसंच जनतेशी असलेलं नातं कायम ठेऊ इच्छितो, असेही मुख्यमंत्री  म्हणाले. तसंच अनावश्यक गर्दी करु नका, मास्क घाला, हात धुत रहा हे महत्त्वाचे सल्ले मुख्यमंत्र्यानी पुन्हा एकदा दिले आहेत.