मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने आपल्या कार्यकाळातील शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (First List of Farmer's Loan Waiver) सोमवारी (24 फेब्रुवारी 2020) जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने (Mahatma Jyotirao Phule Shetkari Loan Waiver Scheme) अंतर्गत यादी जाहीर केली. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पहिल्या यादीत सुमारे 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांची नावं आहेत.
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समवावेश आहे. कर्जमाफीसाठी 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली आहे. त्यापैकी एकूण 68 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरीत शेतकऱ्यांच्या नावांची यादी टप्प्याटप्याने जाहीर केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. पहिल्या यादीत एकूण 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 43 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. (हेही वाचा, Maharashtra Budget session 2020: शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिका कर्जमाफीच्या माध्यमातून सुरु: देवेंद्र फडणवीस)
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारी या दिवशी जाहीर होईल, असे उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच जाहीर केले होते. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (24 फेब्रुवारी 2020) सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यातून शेतकरी कर्जमाफी माहिती दिली होती. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की, महाविकासआघाडी सरकार हे जनतेला बांधील आहे. विरोधकांना नाही. सुरुवातीला सरकारबद्धल अनेकांना शंका होत्या. पण, आता सरकार स्थिर झालं आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी सुरु झाली आहे. महाविकाआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीचं अश्वासन दिलं होतं. या अश्वासनाची उद्या (24 फेब्रुवारी 2020) वचनपूर्ती होणार आहे. पहिली यादी उद्या जाहीर झाली तरी ही प्रक्रीया पूर्ण होण्यास तीन महिने लागतील. सरकार टप्प्या टप्याने शेतकरी कर्जमाफी करेन', असेही उद्धव यांनी स्पष्ट केले होते. (हेही वाचा, Maharashtra Budget Session 2020: महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू; 6 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प)
दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकही जोरदार आक्रमक झाले आहेत. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या वेळी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिकाच रचत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केला आहे.