CM Uddhav Thackeray Interview: मंत्रालयात कमी गेलो या आरोपात दम नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

Chief Minister Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मंत्रालयात जात नाहीत, आपले खासगी निवास्थान 'मातोश्री' येथूनच राज्यशकट हाकतात असा आरोप होतो. प्रामुख्याने विरोधक आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे टीकाकार यांचा नेहमीच आरोप असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरोपाला रोखठोक उत्तर दिले आहे. मी मंत्रालयात कमीत कमी गेलो असा जो आरोप होतो आहे त्यात दम नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दै. सामनासाठी एक मुलाखत दिली या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. दै. सामना संपादक म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले की, सध्या कोरोना व्हायरस संकटाचा काळ आहे. मंत्रालय बंद आहे. मंत्रालयात कमीत कमी गेले असा जो आरोप होतोय त्यात दम नाही. मी माझी भूमिका विस्ताराने सांगतो. आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करु शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्ही. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, मी म्हणजे काही डोनाल्ड ट्रम्प नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत रोखठोक भाष्य (Watch Video))

मी घरी असलो तरी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध बैठका कायम सुरु आहेत. मुंबईचे आयुक्त, सहआयुक्त, विविध सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यासोबत नियमीत बैठका होतात. मध्यंतरी मी मराठवाड्यातील सर्व आमदारांशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुखांशी बैठक झाली. परवा विदर्भातील तिन्ही पक्षांच्या आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. मी घरात बसून सर्व ठिकाणी सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतो आहे आणि ताबडतोब निर्णय घेतोय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.