Eknath Shinde on MVA: महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वांची गळचेपी झाली- एकनाथ शिंदे
Eknath Shinde (Pic Credit - ANI)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सर्वांचीच घुसमट होत होती. त्यामुळे आता बाहेर पडल्यानंतर मोकळे वाटत आहे. आमचे सरकार हे बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व मानणारे आहे. आमच्या सरकारमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथील सिद्धविनायक मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडीमध्ये असताना अनेकदा अपमानीत व्हावे लागत असेल. अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जात असतानाही आम्हाला गप्प बसावे लागत होते. त्यामुळे आमची घुसमट होत होती असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. या राज्याचा विकासाचा गाडा आता योग्य मार्गावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Ashadhi Wari 2022 : विठूनामाच्या गजरात संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल, आगमन प्रसंगी पालखीचं जल्लोषात स्वागत)

एकनाथ शिंदे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांच्यासोबत पदाधिकारी आणि आमदाराही होते. येथे त्यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूजा केली. गणपतीचा मानाचा नारळ प्रसाद म्हणून या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. विश्वासमत ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कामाला लागले. राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळीच संवाद साधला. महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.