एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आजही ब्रीज कॅन्डी रूग्णालयामधून (Breach Candy Hospital) सुट्टी मिळालेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज संध्याकाळी रूग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी आजच्या सार्या बैठका देखील रद्द केल्या आहेत. मुंबईत पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाणे येथील आपल्या खाजगी निवासस्थानी रवाना झाले आहेत.
दरम्यान शरद पवार यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. सध्या न्युमोनियाच्या उपचारांसाठी शरद पवार ब्रीज कॅन्डीमध्ये दाखल आहेत. त्यांना 1-2 दिवसांत हॉस्पिटल मधून सुट्टी मिळणार होती पण डॉक्टरांना अजूनही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा वाटत नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे. एनसीपीचं शिर्डी मध्ये अभ्यास शिबिर सुरू आहे. या शिबिराला पवार पोहचणार अशी चर्चा होती पण आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. तर पवारांना भेटून आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'पवार साहेब उद्या हेलिकॉप्टरने शिर्डीला जातील आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होतील. काही चाचण्या, तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.' असं म्हटलं आहे.
राजेश टोपे यांनी पवारांच्या प्रकृतीची माहिती देताना 'पवार साहेबांनी अनेक मोठ्या आजारांना हरवलं आहे. त्यासमोर न्यूमोनिया किरकोळ आजार आहे. दिवाळीत ते अनेक लोकांना भेटले. या भेटीत सतत बोलण्याने, भेटल्याने त्यांना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान 'राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा' या शिबिरात आज अजित पवार, जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे.