मुंबापुरीतील चाकरमानी, शाळकरी, अशा सर्वांना त्यांच्या घरचे पौष्टिक जेवण खाऊ घालणाऱ्या डब्बेवाल्यांना (Mumbai Dabbawala) दक्षिण मुंबईतील (South Bombay) जवळपास 50 टक्के शाळांमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र आता या डब्बेवाल्यांच्या बाजू घेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री (Education Minister Vinod Tavde) विनोद तावडे यांनी शाळांना प्रतिबंध हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला योग्य ती पाऊल उचलण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत, अशी माहिती टाइम्सच्या वृत्तानुसार समोर येत आहे.
डब्बेवाल्यांमुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेला व आरोग्याला धोका आहे असं सांगून शाळांनी ही बंधने लावायला सुरवात केली होती. मुंबई डब्बेवाला असोसिएशनने या बंदीच्या विरोधात माहिती देत, "खाजगी शाळा घरगुती डब्ब्यांवर बंदी आणुन मुलांना शाळेच्या कँटीन मध्ये खाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यातून होणाऱ्या आर्थिक फायद्याने स्वतःचे खिसे भरण्याचा शाळांचा स्वार्थ आहे" असा आरोप करणारे एक पत्रक जाहीर करण्यात आले होते. याची दखल घेत मुंबईतील भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शाळांना डब्बेवाल्यांवरील बंधन हटवण्याचे आवाहन करणारे एक पत्र लिहिले आहे. मुंबई मधील 50 % शाळांमध्ये डब्बावाल्यांना नो एंट्री!
"शाळांना जर सुरक्षा कारणास्तव काही समस्या येत असतील तर त्यांनी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रमाणे डब्बेवाल्यांसाठी देखील रजिस्ट्रेशन सुरु करावे ज्यानुसार शाळेत सेवा पुरवणाऱ्या डब्बे वाल्याला एक ओळखपत्र देण्याची तरतूद करावी" असा सल्ला शेलारांनी शाळांना दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी शाळा व डब्बेवाला संघटनेची एकत्र मीटिंग घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील शाळांमध्ये डब्बेवाल्यांना प्रवेश देण्याच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला आहे.
मुख्यमंत्री व इतर राजकीय नेत्यांनी या प्रश्नांची दखल घेतल्याबद्दल डब्बावाले असोसिएशनचे अधिकारी सुभाष तळेकर यांनी आशिष शेलार,देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचे विशेष आभार मानले आहेत.यासोबतच लवकर शाळांसोबत मीटिंग घेऊन या समस्येवर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे.