खुशखबर! मुंबईत कोळी भवन बांधण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोळी बांधवांना आश्वासन
CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

मुंबईतील वेगवेगळ्या धर्माचे, भाषेचे लोक राहतात हे आपल्याला माहितच आहे. यात एक असा वर्ग आहे जो समुद्राने वेढलेल्या मुंबईची खरी ओळख आहे तो म्हणजे कोळी समाज. या कोळी समाजाला मुंबईत कोणतेही भवन नसल्यामुळे संपुर्ण कोळी बांधवांसाठी मुंबईत कोळी भवन बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलीय. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कोळी महासंघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने षण्मुखानंद हॉलमध्ये कोळी मच्छिमार महिलांना शीतपेट्या वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोळी बांधवांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील राहील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री साध्वी निरंजन ज्योती, महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते.

मच्छिमारी करणा-या कोळी महिलांना देण्यात आलेल्या शीतपेट्यांमुळे महिलांना एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे असेही ते म्हणाले. तसेच आमदार रमेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे स्वागत करुन कोळी समाजाचे अनेक प्रश्न महोदयासमोर मांडले. यामध्ये डी.सी.आर., सिमांकन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील मच्छिमार्केटचे रिडेव्हलपमेंट, मच्छिमार महिलांना परवाने मिळविण्याबाबत, फिश ऑन व्हील, शॅक्स ऑन बीच, छत्रपती शिवाजी मंडई असे अनेक प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडले. हेही वाचा- देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई काही मिनिटात' म्हणत शेअर केली Mumbai Metro Project ची खास झलक; अमिताभ बच्चन यांचा सहभाग 'या' कारणाने ठरला चर्चेचा विषय (Watch Video)

मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करुन आम्ही विधानपरिषदेसाठी कोळी समाजाच्या प्रश्नांची जाण असणा-या एका चांगल्या व्यक्तीची निवड केली असून त्यांच्यासह मिळून कोळी बांधवांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.