पुणे (Pune) शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती (Helmet Compulsion) करण्याचा बडगा उगारला. त्याला पुणेकरांनी जारोदार विरोध करुन हेल्मेटसक्ती मागे घेण्यास पोलिस प्रशासनाला भाग पाडले. आता पुण्यानंतर नाशिक शहरातही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी नाशिक (Nashik) शहरात हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुणेकरांप्रमाणे आता नाशिककरही हेल्मेटसक्ती विरोधात उभे ठाकले आहेत.
नाशिक शहरात पोलिसांनी सुरु केलेल्या हेल्मेट सक्तीला नागरिकांनी प्रचंड विरोध केला आहे. काही ठिकाणी या हेल्मेटसक्तीवरुन पोलिस आणि नागरिक यांच्यात वादावाचेही प्रकार घडले. ही वादावादी तीव्र स्वरुपाची होती. काही नागरिकांनी तर आमचे लायन्स जप्त करा, गाडी जप्त करा आणि आम्हाला दंड करुन कुठे फाशी द्यायचे तिथे द्या, अशा भाषेत आपला उद्रेक व्यक्त केला.
हेल्मेटसक्ती ही आपल्या फायद्यासाठी आहे. आपल्या सुरक्षीततेसाठीच आहे. यात आमचा काहीच स्वार्थ नाही. नागरिकांची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांच्या या मुद्द्यावर नाशिकच्या नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. केवळ पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी पोलिसांनी ही योजना आणली असल्याचा काही नागरिकांनी आरोप केला. तर, काही नागरिकांनी आगोदर शहरातील रस्ते ठिक करा, मगच हेल्मेटसक्ती करा असे सांगितले. तर, काही नागरिकांनी पाचशे रुपये दंड आकारण्यापेक्षा त्याच किंमतीचे पोलिसांनी हेल्मेट खरेदी करावे आणि संबंधीत दुचाकीस्वाराला द्यावे, अशीही भूमिका काही नागरिकांनी व्यक्त केली. (हेही वाचा, नाशिक शहरात हेल्मेटसक्तीसाठी आजपासून राबविली जाणार विशेष मोहीम)
दरम्यान, पोलिसांना आमच्या सुरक्षेची इतकीच काळजी आहे तर, पोलिसांनी आपली सुरक्षा अधिक कडक करावी. सुट्टी असल्यामुळे नागरिक गावी जातात. अशा वेळी घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. त्याला आळा घालावा. तसेच, पोलिसांनी हेल्मेटसक्ती ही शहरापेक्षा ग्रामिण भागात अधिक मोठ्या प्रमाणावर करावी. ग्रामिण भागात रस्त्ये अत्यंत खराब असतात. त्या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही मोठे असते. त्यामुळे पोलिसांना हेल्मेटसक्ती करायचीच असेल तर, आगोदर ग्रामिण भागात करावी, असा सूरही काही नागरिकांनी आळवला.