Tractor Accident | Representative Image (Photo Credit: Pixabay)

Accident Dhule: सर्वत्र गणपती विसर्जनाची (Dhule Ganapati Immersion) धाममधूम सुरु असताना धुळे (Dhule) शहराजवळ असलेल्या चितोड गावात (Chitod Accident) मात्र स्मशानशांतता आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्या गेल्याने गावातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतरही पाच ते सहा गावकरी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाील असून, अपघात नेमका घडला कसा याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. गावात गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने विसर्जन कार्यक्रमावर दु:खाचे सावट आहे. पोलिसांनी (Dhule Police) घटनेची नोंद घेतली असून, चौकशी सुरु केली आहे. अधिक माहिती अशी की, मृतांमध्ये अनुक्रमे 4,7,14 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून चालक ट्रॅक्टरसह ताब्यात

गावामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक सरु होणार होती. सर्व तयारी झाली होती. दरम्यान, गावात एक ट्रॅक्टर उभा होता. प्राप्त माहितीनुसार, तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरच्या आजूबाजूला खेळत होत्या. इतक्यात चालक आला आणि त्याने ट्रॅक्टर सुरु केला. दरम्यान, ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे चाक मुलींच्या अंगावरुन गेले आणि त्या चिरडल्या गेल्या. ज्यामध्ये तिघींचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय, तिथेच उभे असलेल्या पाच ते सहा जणही या घटनेत जखमी झाल्याचे समजते. इतका मोठा अपघात होत असताना चालकाचे लक्ष कोठे होते. त्याला कळले कसे नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रॅक्टर अपघात घडल्याच्या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. घटनास्थळाची पाहणी करुन ट्रॅक्टरही ताब्यात घेतला आहे. घटनेचा पंचनामा केला जात असून ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Kanchanwadi Accident: छत्रपती संभाजीनगर येथे भरधाव ट्रकने 13 वाहनांना दिली धडक, एकाचा मृत्यू)

राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह

दरम्यान, राज्यभरामध्ये गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात सुरु आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर अशा विविध ठिकाणी गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुका निघाल्या आहेत. याशिवाय राज्यातील शहरं, निमशहरं आणि गाव-खेड्यांमध्येही गणपती विसर्जन सुरु आहे. गावोगावचे गणपती पारंपरीक रितीरिवाज आणि मानपानाने विसर्जित होत आहेत. दरम्यान, धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावात अपघाताची घटना घडल्याने विसर्जनाच्या उत्साहावरच विरजन पडले आहे. गावमध्ये दु:खाची लाट निर्माण झाली असून, सर्वत्र ही घटना घडलीच कशी याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेतील जखमींची नावे समजू शकली नाहीत.