भारतात चायनीज हॉटेल आणि सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, आणि सर्वसामान्यांनी भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील सर्व चायनीज हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी चायनीज पदार्थांवर पूर्णपणे बंदी घाला, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. चायनीज हॉटेल्स व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लखाडच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण भारत पटून उठला आहे. चीनच्या कुरापतींवर देशात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. देशात ठिकठिकाणी चीनच्या झेंड्याची होळी केली जात आहेत. त्याचवेळी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी चीनच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना परखडपणे आपली मते मांडली आहेत. चायनीज फूडवर पूर्णपणे बंदी घालायला हवी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. हे देखील वाचा- शिवसेना खासदार अनिल देसाई यांची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक; दूर होणार काँग्रेसची नाराजी?

रामदास आठवले यांचे ट्वीट-

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली.