CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

विकास सर्वांगिन असायला हवा. विकास करताना निसर्गाचा समतोल बिघडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Development) यांनी केले आहे. नाव्हा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज (22 फेब्रुवारी 2021) मुख्यमंत्री ठाकरे ( (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मंत्रीमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सींग पाळून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना या वेळी म्हणाले, आपण विकासाच्या नावाखाली काम करतो आहोत. असे असले तरी आपल्याला पाण्याची निर्मिती मात्र करता आली नाही. त्यामुळे पाणी जपून वापरायला पाहिजे. शिवाय वनसंपदा नष्ट करुन आपण कसला विकास साधणार? असा सवालही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. (हेही वाचा, I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा)

काही दिवसांपूर्वी झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीचा दाखला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निती आयोगाच्या बैठकीत मी प्रामुख्याने मुद्दा उपस्थित केला की, निसर्गाचा समतोल न बिघडवता आपण विकास केला पाहिजे, असे आपण या बैठकीत सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी पालघर जिल्ह्यातील जाव्हारला गेलो होतो. जाव्हारला हिल स्टेशन म्हणून विकसीत करायला हवे, असे ते म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले,  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. सर्वांनी खबरदारी घ्या. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करा. कृपा करुन नियम पाळा. लॉकडाऊन लावायला लावू नका, असे कळकळीचे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता आवश्यकता भासल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो, असेही अजित पवार म्हणाले.