Sangli Kolhapur Flood: गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये. यासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे. अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) मान्सूनपूर्व आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला या वेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीस आपत्ती उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, तसेच रेल्वे, विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी सहागी होते.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईत 2005 मध्ये आलेल्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधानिशी काम करू लागलो आहोत. त्यामुळे नाले सफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक ती कामे पूर्ण करा. पावसाळ्यात पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे पाईप्स मोकळे आहेत का तेही पाहा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे. पडले तर तत्काळ बुजविणे महत्त्वाचे आहे. दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य, औषधींचा पुरेसा पुरवठा करा. विभाग व जिल्हावार बैठकांमध्ये डॉक्टर्सना सहभागी करून पावसाळ्यातील रोगांसंदर्भात नियोजन करा, असेही मख्यमंत्री या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Mumbai Monsoon 2020 Date: मुंबईत जून च्या दुसऱ्या आठवड्यात 'या' दिवशी मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज)
ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks , आपत्ती व्यवस्थापन मंत्री @VijayWadettiwar , राज्यमंत्री @prajaktdada , मुख्य सचिव अजोय मेहता, तसेच रेल्वे, विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी सहभागी. pic.twitter.com/YLB3kKLz2f
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2020
दरम्यान, राज्यात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, 1 ते 2 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने या आधीच व्यक्त केला आहे. तसेच अल निनोचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव पडणार नाही. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. राज्यात 11 जून रोजी पाऊस येण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.