कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने 'ब्रेक द चेन' (Break The Chain) चे धोरण अवलंबले असून त्या अंतर्गत अनेक कडक निर्बंध, विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. यावर विरोधी पक्षांने आपेक्ष घेत नियमांत सुधारणा व्हावी, असे सरकारला सांगितले आहे. त्यासोबत या नियमांमुळे सरकारला व्यापाऱ्यांचा रोषही सहन करावा लागत आहे. परंतु, कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील निर्बंध अधिक कडक करायचे की शिथिल यावर चर्चा होणार असून दहावी, बारावीच्या परीक्षांबाबतही विचारविनिमय केला जाईल. तसंच या बैठकीत कोरोनाची सध्याची परिस्थिती, लसींचा साठा यावरही चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील कडक निर्बंधांमुळे व्यापारी रस्त्यावर उतरले असून सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे यात भाजप आणि इतर पक्षांचा व्यापाऱ्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे या परिस्थिती निर्बंधात सूट द्यायची की नाही, यावर सर्व पक्षातील नेते आपली भूमिका मांडतील.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे मदत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, रुग्णसंख्येतील वाढ कमी होत नसल्याचे निर्बंध अधिक कठोर करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आजच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांना थेट प्रमोट करावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारला विद्यार्थ्यांची चिंता असल्याचे बोलून दाखवले. तसंच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही होत आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा हा या बैठकीतील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा असेल.