Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) सातारा पोलीस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटूंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली असून पती पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.तर तिघांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30 वर्षे) पूजा मोहन डांगर (वय 25 वर्षे) आणि श्रेया डांगर (वय 5 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तिघांचे नावं आहेत.

मोहन डांगर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे याची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहत होते. तसेच शेती करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

गुरुवारी रात्री डांगर कुटुंब जेवण करुन झोपले. तर पूजा याचं सासर माहेर एकाच गावात असल्याने त्यांची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. मात्र शुक्रवारी सकाळी श्रेया घरी आली नसल्याने आजी तिला पाहण्यासाठी मोहन यांच्या घरी आल्या होत्या. दरम्यान घरात पाहताच त्यांना नातीसह तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मोहन डांगर यांनी पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वतः गळफास घेतला असल्याचं संशय आहे. मात्र पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. असे असलं तरीही मोहन यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र कळू शकले नाहीत.